औरंगाबाद- लग्नसोहळा झाला की जागरण गोंधळ घालण्याची परंपरा आहे. श्रद्धा म्हणून किंवा नवस म्हणून देखील हा गोंधळ घातला जातो. वर्षभरातून जवळपास 9 ते 10 महिने जागरण गोंधळ कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळते. विशेषतः लग्नसराईत मोठी उलाढाल होत असते. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे जागरण गोंधळ घालणाऱ्या लोककलावंतांवर हालाकीचे दिवस आले आहेत.
तुळजापूरच्या तुळजाभवानीचा आणि जेजुरीच्या खंडेरायाच्या जागरण गोंधळाची ही परंपरा अनेक शतकांपासून अस्तित्वात आहे. जागरण गोंधळाचे सादरीकरण करून हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र, कोरोनाच्या संसर्गाची भीती वाढल्याने लग्न समारंभ रद्द करण्यात आले, तर काही ठिकाणी अगदी साध्या पद्धतीने विवाह सोहळे होत असल्याने जागरण गोंधळाचे कार्यक्रम अनेकांनी स्थगित केले आहे. त्यामुळे गोंधळ घालणाऱ्या गोंधळी समाजावर उपासमारीची वेळ आली आहे.
कोरोनामुळे गोंधळींवर उपासमारीची वेळ मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश याभागांमध्ये जागरण गोंधळ मोठ्या प्रमाणात घातला जातो. लग्न झाल्यावर नवीन जोडप्यांच्या सुखी संसारासाठी देवाचं नामस्मरण या निमित्ताने केलं जातं. तर काही ठिकाणी नवस किंवा परंपरा म्हणून देखील गोंधळ घातला जातो. हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह या निमित्ताने होतो. मात्र, यावर्षी गोंधळ घालण्याचे प्रमाण नगण्य असल्याने जागरण गोंधळाचे कार्यक्रम घेणाऱ्या गोंधळींसह त्यांच्यासोबत असणाऱ्या वाघ्या मुरळींवर उपासमारीची वेळ आली आहे.
गोंधळीचा चार ते पाच जणांचा समूह असतो. यामध्ये ढोलकी, संबळ वादकांसह वाघ्या मुरळी यांचा समावेश असतो. दरवर्षी किमान शंभर कार्यक्रम एक समूह साजरा करतो. त्यामधून प्रत्येक सदस्याला दीड ते दोन लाखांचं उत्पन्न होतं. मात्र, यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे सामूहिकरित्या होणारे कार्यक्रम रद्द झाल्याने जागरण गोंधळाचे कार्यक्रम देखील कमी प्रमाणात झाले. त्यामुळे गोंधळींचे उत्पन्नावर परिणाम झाला. परिणामी गोंधळी समाजावर आणि लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने आम्हाला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी गोंधळी समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.