औरंगाबाद - 'काँग्रेसवाले ताप देतात, तेव्हा मी भाजप वाल्याला बोलावतो, असे उद्धव ठाकरे यांनी माझ्या कानात सांगितले' असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. जिल्हा परिषद इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू होण्याच्या काहीकाळ आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कानाजवळ जात काहीतरी बोलले होते. याबाबत दानवे यांना विचारले असता त्यांनी असे उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ -
जिल्हा परिषद इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी काळातील मित्रपक्षाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय भूकंप झाला. कार्यक्रम सुरू होण्याआधी उद्धव ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांच्या कानाजवळ काहीतरी सांगितले. त्याबाबत बोलताना रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या शैलीत वर्णन केले. सध्या तरी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सध्या ताप देणार नाहीत. मात्र कधी दिलाच तर बसू असे मत दानवे यांनी व्यक्त केले.
मी आशावादी -
राजकारणात मी नेहमी आशावादी असतो आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्या भाषणात ते आशावादी असल्याचे म्हणाले. त्यांनी वक्तव्य करून काही तास झाले आहेत. काही काळ जाऊ द्या सर्व कळेल असे रावसाहेब दानवे यांनी माध्यमांना सांगितले.