औरंगाबाद - भाजप नेत्या पंकजा मुंडे पुन्हा एकदा पक्षात नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. औरंगाबादमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या भाजप मेळाव्याला पंकजा मुंडे यांनी दांडी मारल्याने त्या नाराज असल्यानेच बैठकीला आल्या नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
मागील काही महिन्यांपासून पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा रंगत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांच्या नाराजीचा चर्चा रंगत आहेत. यावेळी पदवीधर मतदारसंघात उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून त्या नाराज असल्याची चर्चा जोर धरत आहे. पदवीधर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले पंकजा मुंडे समर्थक अशी ओळख असलेल्या प्रवीण घुगे यांच्या ऐवजी शिरीष बोराळकर यांनी उमेदवारी मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज झाल्यानेच त्या बैठकीला आल्या नाहीत या चर्चेला जोर आला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे या सुद्धा शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. तर भाजप नेत्यांकडून ही चर्चा फक्त अफवाच असल्याचं पटवून देण्यात येत आहे. मात्र पंकजा मुंडे मराठवाड्यातील पक्षबांधणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकींना हजर राहत नसल्यानेने भाजप नेत्यांच्या या दाव्यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पंकजा मुंडेंना भाजपमध्ये डावलले जात असल्याची चर्चा अनेकदा ऐकायला मिळाली.
प्रवीण घुगे यांना उमेदवारी नसल्याने नाराजी?पदवीधर निवडणुकीत पंकजांचे खंदे समर्थक असलेले प्रवीण घुगे यांना उमेदवारी मिळावी यासाठी पंकजा मुंडे गटाने जोरदार प्रयत्न केले. मात्र दोन दिवसांपूर्वी शिरीष बोराळकर यांना उमेदवारी मिळणार अशी शक्यता होती. आज भाजपतर्फे अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे पंकजा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
पंकजा नाराज नाहीत, त्यांनी अधिकृत नाराजी व्यक्त केलेली नाही -पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण देत पंकजा मुंडे नाराज नाहीत असं सांगितलं. सोशल मीडियावर काय बोललं जातं, याबाबत बोलणार नाही. आपल्या उमेदवाराला संधी मिळावी अस वाटत पण तसं होत नसतं. पंकजा मुंडे यांनी अधिकृत नाराजी व्यक्त केलेली नाही, मुंबईत त्यांच्या कारखान्याचे काम असल्याने त्या आल्या नाहीत, त्यांनी तसा निरोप दिला होता. तुम्हाला आवश्यक असल्यास मी मेसेज दाखवू शकतो अस स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिल.
नागपूरला अधिवेशन घेण्याचं उद्धव ठाकरे यांच्यात धाडस नाही -
येणारं हिवाळी अधिवेशन कुठे घ्यायचं असा प्रश्न आहे, कारण अधिवेशन नागपूरला घेण्याचे सरकारचं धाडस नाही, कारण त्यासाठी मुख्यमंत्र्यांना प्रवास करण्यासाठी मातोश्री बाहेर निघावे लागेल. मात्र आम्ही कामगार शेतकऱ्यांचे, उद्योजकांचे, बारा बलुतेदारांचे प्रश्न अधिवेशनात मांडू असा टोला चंद्रकांत पाटील त्यांनी लावला.
मुंबई कारशेडला उद्धव ठाकरेंमुळे विलंब -
मुंबई कारशेडवरून मुख्यमंत्रीच त्यात मिठाचा खडा टाकताहेत, या गोंधळात प्रोजेक्ट कोस्ट वाढेल आणि 5 वर्ष किमान हा प्रोजेक्ट होणार नाही, स्पष्ट सांगतोय, हे लक्षात घ्या असा टोला त्यांनी लावला.
सरकारकडून मराठा समाजाची फसवणूक -
मराठा समाज आरक्षणावरून ही समाजाची फसवणूक सुरू आहे, असे पाटील म्हणाले. सध्या जी नोकर भरती सुरू होती, त्यासाठी पात्र झालेल्या उमेदवारांची प्रक्रिया होईपर्यंत स्थगिती नको, अशी भूमीका न्यायालयात राज्य सरकारने मांडायला हवी, मात्र तसं केलं नाही असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.
शेतकऱ्यांना मदत देण्यात सरकार असमर्थ -
शेतकऱ्यांना आधी जी मदत जाहीर केलीये तीच तोकडी आहे. त्यात आता अर्धे पैसे जमा केले काय म्हणावं कळत नाहीये. हेक्टरी मदत कमी आहे आणि त्यात अर्धेच पैसे म्हणजे योग्य नाही असे सांगत त्यांनी आज शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीवर नाराजी व्याक्त केली. आमची सरकार असती तर आम्ही कर्ज काढून मदत केली असती अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी सांगितली.