औरंगाबाद -स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी १९ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. तर २२ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला असून, दोन ते तीन उमेदवार माघार घेण्याची शक्यता आहे. यामुळे ही निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता - निवडणूक
जालना व औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सात जणांनी उमेदवारी दाखल केले होते. यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला असून 5 ऑगस्ट पर्यंत दोन ते तीन उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतील अशी शक्यता आहे. त्यामुळे हि निवडणूक चौरंगी आणि अटीतटीची होणार हे निश्चित आहे.
उमेदवारांपैकी विशाल नांदरकर यांचा अर्ज कागदपत्राच्या अभावी बाद ठरल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सध्या असलेल्या सहा वैध अर्जांपैकी माघार कोण घेणार, याकडे लक्ष लागले आहे. किमान तीन उमेदवार माघार घेणार असल्याची चर्चा आहे. तसे झाले तर तिरंगी आणि दोन उमेदवारांनी माघार घेतली तर चौरंगी लढत होण्याचे संकेत आहेत.
चौरंगी लढत झाल्यास युतीच्या उमेदवाराला फोडाफोडीच्या राजकारणाचा सामना करावा लागेल. यामुळे युतीचा विजय सहज मानला जात असला तरी तो म्हणावा तितका सोपा नसेल. लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता भाजपच्या मतांना विशेषतः जालना जिल्ह्यातील सभासदांच्या मतांना आपल्या पारड्यात पाडण्याचे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे. मात्र राज्याचे मंत्री आणि युतीचे नेते अर्जुन खोतकर यांनी आपला विजय सहज शक्य होईल असा विश्वास व्यक्त केलाय.