औरंगाबाद- अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात 48 लाख हेक्टरपैकी 32 ते 36 लाख हेक्टरहून अधिक नुकसान झाल्याच्या प्राथमिक आकडा आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे 4 हजार कोटींची नुकसान प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली आहे. राज्याने पीक कर्जाचा हजार कोटींचा हप्ता दिल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, की प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. त्याबाबत बैठक घेण्यात आली. काही जणांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. ओल्या दुष्काळाचा निर्णय मुख्यमंत्रीस्तरावर होईल. याबाबत मी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहे. वेळप्रसंगी कर्ज काढू, पण मराठवाड्याच्या आणि राज्यातील कुठल्याच शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.
सरसकट सगळ्या पंचनाम्यांची वाट पाहण्याची गरज नाही-
राज्याने अतिवृष्टीबाबत अहवाल दिला नसल्याने केंद्र सरकार मदत कशी करणार अशी माहिती केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिली. मात्र, एनडीआरएफचे निकष सगळीकडे सारखे असतात. पंचनामे झालेल्या ठिकाणांची माहिती मंत्रालयात आल्यानंतर मदत करण्यात येईल. सरसकट सगळ्या पंचनाम्यांची वाट पाहण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. एनडीआरएफच्या निकषानुसार काम सुरू आहे. मुखमंत्र्यांना सोमवारी याबाबत अहवाल देणार आहेत. त्यावर मुखमंत्र्यांसोबत सोबत चर्चा होईल, असेदेखील अजित पवार यांनी सांगितले.