अमरावती : गेली सहा ते सात दिवसांपासून अमरावतीसह महाराष्ट्राभर अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने अमरावती जिल्ह्यात ( Meteorological Dep. warns Amravati ) पुढील दोन दिवस अति मुसळधार पाऊस ( Two Days of Torrential Rain ) कोसळणार, असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्याला सावध राहण्याचा ( Entire District has been warned ) इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सर्वत्र कोसळणार मुसळधार : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड, चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमध्ये 100 ते 180 मिलिमीटर पर्यंत पाऊस कोसळणार, असा अंदाज हवामान खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. यासह चांदूरबाजार, अचलपूर, अमरावती, नांदगाव खंडेश्वर या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी 70 ते 100 मिलिमीटर पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
ग्रामीण भागात सावधतेचा इशारा :जिल्ह्यातील ग्रामीण भागासह नदीनाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ज्या गावात नदीकाठी पुराच्या भिंती आहेत, अशा ठिकाणी असलेल्या जनावरांच्या गोठ्यात जनावरे बांधून ठेवू नये, अशी सूचनादेखील ग्रामस्थांना देण्यात आली आहे.
अप्पर वर्धा धरणाचे पाच दरवाजे उघडले :विदर्भातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असणाऱ्या जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा बुधवारी रात्रीपर्यंत 70% च्या वर झाला आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे अप्पर वर्धा धरणाचे पाच दरवाजे बुधवारी रात्री 11 वाजता 20 सेमीपर्यंत उघडण्यात आले. या दरवाजातून 160 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतो आहे.
धरणालगतच्या गावांना सावधानतेचा इशारा : मध्य प्रदेशात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण झपाट्याने तुडुंब भरत आहे. अप्पर वर्धा धरणालगत असणाऱ्या गावांनादेखील सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार, पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळून अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा वाढला, तर धरणाच्या 13 दरवाजांपैकी आणखी काही दरवाजे उघडल्या जाण्याची शक्यता आहे.