अमरावती- विदर्भाचा राजा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अमरावतीच्या न्यू आझाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या भव्य गणरायाच्या मूर्तीची आज अमरावती शहरात भव्य मिरवणूक निघाली. या मिरवणुकीमुळे अमरावती शहर दुमदुमून गेले. विशेष म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्याच्या उद्देशाने विदर्भाच्या राजाचे विसर्जन न करता गणरायाची ही भव्य मूर्ती पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात पुन्हा एकदा स्थापन केली जाणार आहे.
अमरावतीत निघाली विदर्भाच्या राजाची भव्य मिरवणूक - Amravati news
अमरावतीतील विदर्भाच्या राजा गणेशाची परंपरे प्रमाणे भव्य विसर्जण मिरवणूक अमरावती शहरातून निघाली. याचा मूर्तीची पुढच्या गणेशोत्सवात पुन्हा स्थापना केली जाणार आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयालगत खापर्डे बगीचा परिसरात न्यू आझाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणेशोत्सवादरम्यान अमरावती शहरातील सर्वात भव्य अशी गणरायाची मूर्ती स्थापन केली जाते. गणेशोत्सवादरम्यान अमरावती शहरासह जिल्हाभरातील भाविकांची गर्दी विदर्भाच्या राजाच्या दर्शनासाठी उसळते. अनंत चतुर्दशीला शहरातील सर्व घरगुती आणि लहान मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपतीचे विसर्जन झाले असताना दरवर्षीप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या चार दिवसानंतर विसर्जनासाठी विदर्भाच्या राजाची भव्य मिरवणूक खापर्डे बगीचा येथून निघाली. या मिरवणुकीत अमरावती शहरातील सर्व ढोल-ताशा मंडळ सहभागी झाली. छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती यासोबतच टाळ मृदुंगाच्या नादात रंगलेले वारकरी या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले. इर्विन चौक, रेल्वेस्थानक चौक, राजकमल, जयस्तंभ, मालवीय चौक मार्गे विदर्भाच्या राजाची मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत तीस ते पस्तीस हजार अमरावतीकर सहभागी झाले होते.