अमरावती -रविवारी सायंकाळी अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार वाऱ्यासह हजेरी लावली. या पावसाने काही शेतकऱ्यांचे आयुष्य क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. कोरोनाच्या महामारीत एकीकडे बेजार झालेला शेतकरी या वादळी पावसाने पुरता गारद झाला. अमरावतीत प्रामुख्याने कांदा, संत्रा, केळी, पपई या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
अमरावतीमध्ये अवकाळी पावसाने कांदा आणि पपई पिकाचे नुकसान... हेही वाचा...'जगण्यासाठी शहरात आलो; जिवंत राहण्यासाठी गाव गाठले', मजुरांची 600 किमीची पायपीट
आधीच घरात कापूस 'लॉक' झालाय आणि आता कांदा पण भिजला...
रविवारी सायंकाळी आलेल्या अवकाळी पावसाने मोझरी येथील शेतकरी विठ्ठल तडस यांच्या दोन एकर क्षेत्रातील कांदा भिजला. त्यामुळे हा कांदा आता सडण्याच्या मार्गावर आहे. 'दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खुप मेहनत करून कापूस, तूर यांचे पीक घेतले. परंतू तूर काढणीच्या वेळी वन्यप्राण्यांनी शेतात हैदोस घातला आणि दोन एकर क्षेत्रातील तूर जमीनदोस्त झाली. त्यानंतर पुन्हा मेहनत करून कपाशीचे उत्पन्न घेतले परंतु मागील दीड महिन्यांपासून देशांत लॉकडाऊन असल्याने हजारो रुपयांचा कापूस घरातच लॉक झाला आहे. शेवटी कांद्यावर सारी भिस्त ठेवत कांद्याची लागवड केली. वन्यप्राण्यांपासून कांदा वाचवला परंतु आता तोही अवकाळी पावसाने हातातून हिसकावून घेतला' अशी खंत अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील शेतकरी विठ्ठल तडस यांनी व्यक्त केली आहे.
विठ्ठल तडस हे मागील दहा वर्षांपासून कांदा पिकाचे उत्पादन घेतात. स्वतःच्या मालकीची शेती अल्प असल्याने ते लागवडीसाठी इतरांची शेती घेतात. यावर्षी कापूस निघाल्यानंतर त्यांनी कांद्याची लागवड केली होती. कांद्याचे पीक चांगले आले होते आणि कांदा आता काढणीला आला होता. राविवारी सकाळी मजूरांच्या हाताने एक एकरातील कांदा काढला देखील होता. परंतु वाळवण्यासाठी तो शेतात तसाच राहू दिला होते. मात्र, रविवारीच आलेल्या अवकाळी पावसाने हा कांदा भिजला अन् होत्याचे नव्हते झाले.
पोटच्या लेकराप्रमाणे पपईची बाग जपलेली पण डोळ्यांसमोर तीचा सडा पडला...
धामणगाव तालुक्यातील वाढोना गावातील शेतकरी पंकज गायकवाड यांच्या वाट्याला देखील निसर्गाची अवकृपा आली आहे. पंकज गायकवाड यांनी मागील वर्षी १४ एकर क्षेत्रावर पपई पिकाची लागवड केली. मागील वर्षी त्यांना समाधानकारक उत्पादन झाले नव्हते. त्यात पीक उत्पादनाला झालेला खर्च देखील प्राप्त झाला नव्हता. मात्र, त्याही परिस्थितीत खचून न जाता त्यांनी यावर्षी सुद्धा पपईची चांगली मशागत केली. महागडे औषध फवारणी केली. त्यामुळे उत्पादन वाढले. परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पपईला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यातच रविवारी आलेल्या मुसळधार पावसाने साऱ्या बागेचे नुकसान केले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जमीनीवर पपईचा सडा पडला.
पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेली पपईची बाग डोळ्यांसमोर उद्ध्वस्त झाली. कुठे झाड मोडली तर कुठे पपईचा सडा पडला. आता या कठीण परिस्थितीत मायबाप सरकारकडूनच काहीतरी मदत व्हावी, अशी अपेक्षा पंकज गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा...दिलासादायक.. राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू - उद्योगमंत्री