अमरावती -राज्यभरातील व्यापाऱ्यांप्रमाणेच जिल्ह्यातील व्यापारी जीएसटीतील जाचक नियमांविरोधात एकत्रित येत आहेत. अन्नधान्यावर जीएसटी ( GST on food grains )आकारण्याच्या निषेधार्थ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ( Agricultural Produce Market Committee ) व्यापाऱ्यांसह घाऊक व्यापारी, डाळ मिल असोसिएशन तसेच ईतरही व्यापारी संघटना यांनी आज कडकडीत बंद ( trade associations strike ) पाळला. विविध व्यापारी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट - दिवसाला १४ ते १५ कोटी उलाढाल असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वत्र शुकशुकाट होता. अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारे ठोक तथा किरकोळ व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ( Shops closed ) ठेवून संपात सहभागी झाले होते. त्यामुळे अमरावतीत व्यपारी वर्ग चांगलाच आक्रमक झाला आहे असे चित्र पहायला मिळत आहे.
व्यापाऱ्यांनी का पुकारला संप? -अन्नधान्य आणि खाद्यान्नावर (नॉन ब्रँडेड) जीवनावश्यक वस्तुवर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त पाच टक्के जीएसटीची आकारणी केल्यामुळे अन्नधान्य यांसह दुग्धजन्य पदार्थ पनीर, दही, तूप, लोणी तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. यामुळे सर्व सामान्य जनता महागाईत भरडल्या जाईल. जीवनावश्यक वस्तूवर ५ टक्के जीएसटी लागू झाल्यास ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसेल . त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांकडून जीएसटी आकरणीला विरोध करण्यात येत असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत संघटनेचे राजेश पाटील यांनी सांगितले.