अमरावती- आज अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि गरिबांच्या कल्याणाचा विचार करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प नवी दिशा देणारा असून सोनेरी भारताचे भविष्य दर्शवणारा असल्याचे राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.
आज मुख्यमंत्र्यांनी डॉ. अनिल बोंडे यांची अमरावतीचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती जाहीर केली. कृषिमंत्र्यांनी रात्री 8.30 वाजता अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली. बैठकीदरम्यान जिल्ह्याच्या नवनियुक्त पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आजपर्यंत अमरावती जिल्ह्याला मिळालेल्या सर्व पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कार्य केले. मी जिल्ह्याचे हित समोर ठेऊन काम करणार आहे. शासन, प्रशासन तळागाळातील गरिबांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाऊल उचलणार आहे. गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम येत्या काळात केले जाणार असल्याचे डॉ. अनिल बोंडे यावेळी म्हणाले.
आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाला नवी दिशा देणारा अर्थसंकल्प सादर केला, असे डॉ. अनिल बोंडे म्हणाले. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांना उद्योगक्षम व सक्षम बनवण्यावर या अर्थसंकल्पात भर दिला असल्याचे कृषिमंत्री म्हणाले. अमरावती जिल्ह्याचे विविध प्रश्न सुटावेत, जिल्ह्याचा विकास झपाट्याने व्हावा, यासाठी सर्वांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहनही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून डॉ. अनिल बोंडे यांनी केले.