अमरावती :दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या ( Lakshmi Pujan in Diwali ) पर्वावर वर्षभराच्या हिशेबासाठी लागणारी वही अर्थात चोपडीची पूजा केली जाते. यानंतरच वर्षभराचा हिशेब व्यापारी, व्यावसायिक या चोपड्यांवर नमूद करतात. हिंदू धर्मात अतिशय मान असणारी ही चोपडी अमरावती शहरात सलग 207 वर्षांपासून शाहीन स्टेशनर्सच्या माध्यमातून मुस्लिम कुटुंब हिंदू बांधवांसाठी उपलब्ध करून देत आहे.
1814 मध्ये हिब्तुल्ला भाई बहिवाला यांनी सुरु केला व्यवसाय :अमरावती शहरात आज प्रभात प्रभात टॉकीज लगत असणारे शाहीन स्टेशनर्स या दुकानासमोर दिवाळीच्या पर्वावर अनेक व्यापाऱ्यांची गर्दी उसळते. या व्यवसायाची सुरुवात शहरातील सराफा बाजारात 1814 मध्ये हिब्तुल्ला भाई बहिवाला यांनी केली होती. त्याकाळी स्वतःच्याच घरी असणाऱ्या छापखान्यात व्यापाऱ्यांना वर्षभराच्या हिशेबासाठी लागणाऱ्या वह्या हिब्तुल्ला भाई बहिवाला हे त्यांच्या बोहरा गल्ली स्थित घरालगत असणाऱ्या छापखान्यात तयार करायचे. सराफा बाजार येथील दुकानातून अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील तसेच लगतच्या अकोला, यवतमाळ, नागपूर ,वर्धा जिल्ह्यातून देखील अनेक व्यापारी दिवाळीच्या पर्वावर हिशेबाच्या नव्या वही खरेदी करण्यासाठी हिब्तुल्ला भाई बहिवाला यांच्या शाहीन स्टेशनर्स वर यायचे. मुल्ला फक्रुद्दीन बहिवाला यांनी 1960 मध्ये त्यांचा हा व्यवसाय सराफा बाजारातून प्रभात टॉकीज लगत हलविला. यावर्षी एप्रिल महिन्यात मुल्ला फक्रुद्दीन बहिवाला यांचे निधन झाले.
बहिवाला कुटुंबाच्या सहाव्या पिढीवर व्यवसायाची धुरा :1814 मध्ये सुरू हिब्तुल्ला भाई यांनी सुरू केलेल्या हिशेब खात्याच्या वयांच्या व्यवसायामुळे ते बहीवाला याच नावाने शहरात ओळखले जाऊ लागले. आज या बहीवाला कुटुंबाची सहावी पिढी या व्यवसायाची धुरा सांभाळीत आहे. सध्या भाई वाला कुटुंबातील पाचव्या पिढीचे ताहेर बहिवाला हा व्यवसाय सांभाळीत असून या कुटुंबाची सहावी पिढी म्हणजे ताहेर बहिवाला यांचा मुलगा अलखमर बहिवाला हा देखील आता आपल्या वडिलांसोबत आपल्या पिढीजात व्यवसायात उतरला आहे.