अमरावती -मागील पन्नास वर्षात पाच-दहा नव्हे तर तब्बल पन्नासपेक्षा जास्त सरकारी अधिकारी आणि कर्मचारी घडवणाऱ्या विदर्भातील एका वाचनालयाची नीती आयोगाने पाठ थोपाटली आहे. या वाचनालयाला नीती आयोगाने प्रमाणपत्र दिले आहे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथील शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय आहे. मागील अनेक वर्षांपासून हे वाचनालय कुऱ्हा येथे चालवले जाते. नुकतेच या सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक सचिव स्व. बबनराव बिंड यांचा 26वा स्मृतिदिन देखील साध्या पद्धतीने करण्यात आला.
'वाचनालय गावाची शान'
अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागातून शासनाचा 'अ' दर्जा प्राप्त करणारे शासन मान्य असे चार वाचनालय आहे. त्यातील एक तिवसा तालुक्यातील कुऱ्हा गावातले असलेले शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय आहे. पुस्तके वाचल्याने व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते. त्याचा बुद्ध्यांक, वैचारिक, पातळी, विचार, विचारांची क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे 'वाचाल तर वाचाल' हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शहीद भगतसिंग वाचनालयाची स्थापना 100 पुस्तकांपासून 1970मध्ये झाली. या संस्थेचे संस्थापक सचिव स्वर्गीय बबनराव बिंड यांनी केली होती. आता या संस्थेचे अध्यक्ष विवेक बिंड हे आहेत. कुऱ्हा हे गाव सामाजिक आर्थिक राजकीय व वैचारिक बाबतीत परिपक्व आहे. त्याचे कारण येथे जपली जाणारी वाचन परंपरा तालुक्यातील सर्वात मोठे व लोकसंख्या म्हणून हे गाव आहे. वाचनालय गावाची शान आहे असे जुने लोक म्हणतात. या प्रत्येक गावात एक वाचनालय असावे त्यामुळे गावातील पुढची पिढी चांगली घडते हे डोळ्यासमोर ठेऊन हे ग्रंथालय उभारण्यात आले होते.
2012मध्ये वाचनालयाला 'अ' दर्जा प्राप्त
अमरावती जिल्ह्यातील ग्रामीणमधील 'अ' दर्जापैकी येथील वाचनालय उत्कृष्ट असून प्रथम क्रमांकावर आहे. या वाचनालयाला तालुक्याचा दर्जा नसतानाही तिवसा तालुक्याचा कारभार येथून चालतो. वाचनालयाला 'अ' दर्जा मिळण्यासाठी शासनाच्या नियमानुसार प्रत्येक चौकटीत बसण्यासाठी 1970पासून अविरत संघर्ष करावा लागला. त्यानंतर 2012मध्ये वाचनालयाला 'अ' दर्जा प्राप्त झाला.
मुख्य रस्त्यालगत आहे भव्यदिव्य इमारत
गावाच्या प्रथम मुख्य रस्त्याला लागून असलेल्या या वाचनालयाची सुंदर अशी इमारत ३५०० स्क्वेअर फूट जागेत उभी आहे. दोन हजार स्क्वेअर फूट जागेत बांधकाम तर उर्वरित भागात सुंदर फुलांच्या वृक्षांनी हिरवळ पसरलेली आहे. पाहताक्षणी कोणालाही भुरळ घालेल, अशी वाचनालयाची वास्तू आहे. येथे दररोज 100पेक्षा जास्त विद्यार्थी नागरिक वाचण्यासाठी येतात. तर 543 वाचक खातेदार आहे. वाचनालयात बालविभाग, महिला विभाग, वाचन कक्ष, कम्प्युटर विभाग, मुलांसाठी अभ्यासिका, संदर्भ विभाग असे स्वतंत्र विभाग पाडले आहे. येथे वेगवेगळ्या वयाचा वाचक वर्ग असून पुस्तकांची संख्या वीस हजारांपेक्षा जास्त आहे.
नीती आयोगाचे प्रमाणापत्र मिळालेले विदर्भातील एकमेव वाचनालय तब्बल २० हजारांपेक्षा जास्त पुस्तकांचा संग्रह
चंपक चांदोबा, कृषी, धार्मिक, आरोग्य, महिला आरोग्य, स्पर्धा परीक्षा, कादंबरी, आत्मचरित्र असे अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. दररोज 18पेक्षा जास्त वृत्तपत्रे येथे येतात. साप्ताहिक मासिक व वार्षिक यांची संख्या 107 आहे. वाचकांना इंटरनेट सुविधा संदर्भ उपलब्ध आहे. त्यामुळे या वाचनालयाचा नागरिक आणि गावकरी पुरेपूर उपभोग घेतात. भव्य असलेल्या इमारतीला कलकत्ता येथील राजाराम मोहन राय संस्थेकडून इमारत बांधकामासाठी दोन वेळा चार लाख 47 हजार रुपयांचा निधी सुद्धा देण्यात आला आहे.
अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी आणि मान्यवरांनी दिल्या भेटी
दिलेल्या भेटी 1996ला उपमुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांनी भेट देऊन 50 हजार रुपये देणगी बांधकामासाठी दिली होती. त्यानंतर नितीन गडकरी, प्रमोद महाजन, माजी आमदार शरद दसरे, माजी मंत्री सुनील देशमुख यांच्यासह विद्याधर गोखले पु. ल. देशपांडे व इतर मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. तसेच वर्षभर विविध कार्यक्रम प्रबोधन व्याख्यान मार्गदर्शन पुस्तक प्रदर्शन उपक्रम सुरू असतात. गावातील सर्व वर्गातील नागरिक जातीधर्मातील लोकांच्या एकीकरणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपले गाव आपला उत्सव हा कुऱ्हा उत्सवच्या माध्यमातून साजरा करण्यात येतो.
विद्यार्थ्यांचा दरवर्षी थाटात सत्कार
येथे शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारदेखील केला जातो. वाचनालय स्थापनेपासून ते सध्याचे अध्यक्ष विवेक बिंड रोड हे वाचनालय सांभाळत आहे. त्यांच्या वडिलांच्या अथक संघर्षातून निर्मिती झालेली हे वाचनालय आहे. या वाचनालयाच्या माध्यमातून गावातील विद्यार्थ्यांना नागरिकांना वाचनालय म्हणून काय देऊ शकतो यासाठी प्रयत्न करतात. लोकवर्गणीतून गावातील लोक किती मदत करतात पुढील भविष्यात वाचनालय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.
हेही वाचा -'नवनीत राणा तुम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा देखील अवमान केला'