अमरावती - राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात जवळपास 800 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा सनसनाटी आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला होता. यासंदर्भात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे तक्रारही केली होती. तर याला प्रत्यूत्तर देताना खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ज्यांनी मागासवर्गीयांचा अधिकार मारला, असा ज्यांच्यावर आरोप आहे, आदिवासींच्या जमीनी लाटल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे, त्यांना आदिवासींबाबत आताच का प्रेम उफाळून आले आहे, असा सवाल महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी विचारला होता. यावर आता नवनीत राणा यांनी पलटवार केला आहे. यशोमती ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या कंपन्यांना कंत्राट दिले, असा आरोप त्यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या कंपन्यांना दिले कंत्राट, नवनीत राणांचा यशोमती ठाकुरांवर पलटवार
राज्य महिला व बालविकास विभाग घोटाळा प्रकरणी काल यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांना टोला लगावला होता. त्यावर आज खासदार नवनीत राणा यांनी यशोतमी ठाकुरांना प्रत्त्यूत्तर दिले आहे.
काय म्हणाल्या होत्या यशोमती ठाकूर -
खोट्या जातप्रमाणपत्राच्या आधारे ज्यांनी मागासवर्गीयांचा अधिकार मारला असा ज्यांच्यावर आरोप आहे, आदिवासींच्या जमीनी लाटल्याचा ज्यांच्यावर आरोप आहे. त्यांना आदिवासींबाबत आताच का प्रेम उफाळून आले, असा सवाल महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या निकषांच्या आधारे पोषण आहाराचे काम देण्यात आले होते, कोविडमुळे हे काम ठप्प पडू नये म्हणून तीची रचना कायम ठेवण्यात आली, असे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले होते. कोविड काळात जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या अंगणवाडी ताई-पर्यवेक्षिका आणि समस्त अमरावतीकरांचा नवनीत राणा यांनी अपमान केला आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीदेखील यशोमती ठाकूर यांनी केली होती.