अमरावती - कोरोनाच्या महामारीत सर्वसामान्य नागरिकांकडून अतिरिक्त वीजबिल वसूल करणाऱ्या राज्य शासनाचा निषेध नोंदवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा कडण्यांत आला. यावेळी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने लिहिलेले पत्र जिल्हाधिकारी शैलेश नवाल याना सादर करण्यात आले.
मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा दोन तास ठिय्या
मनसेचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आला तेव्हा त्यांना पोलिसांनी बाहेर रोखले. मोजक्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी कार्यालयाच्या आवारात प्रवेश देण्यात आला. दरम्यान, जिल्हाधिकारी शैलेश नवाल हे अमरावती विभाग शिक्षक मतदान निवडणूक संदर्भात बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास ठिय्या मांडला.