अमरावती -राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस चिरडले. यामुळे अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक मित्र गंभीर जखमी आहे. सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास रहाटगाव येथील गिरनार होंडा शोरूम समोर हा अपघात झाला.
रुग्णालयातून घरी परततांना दोन मित्रांवर काळाने घाला घातला. या घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे. मनोज राजाभाऊ ढबाळे, असे घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असून ऋषिकेश दादाराव घाटोळ असे जखमीचे नाव आहे. दोघेही तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील असल्याची माहिती आहे.
रुग्णालयातून घरी जात असताना अपघात-
मनोज आणि ऋषीकेश दोघेही सकाळी दुचाकीने अमरावती येथील खासगी रुग्णालयात आले होते. रुग्णालयाचे काम झाल्यानंतर दोघेही दुचाकी वाहनाने वाठोडा खुर्द येथे परत जात असतांना १८ चाकी मालवाहू ट्रकने दुचाकीस धडक दिली. दुचाकी सह मनोज ट्रकच्या मागील चाकात आल्याने ताचा जाग्यावरच मृत्यू झाला. तर मागे बसलेला ऋषिकेश गंभीररित्या जखमी झाला आहे.
दोन मित्रांना भरधाव ट्रकने चिरडले काही काळ वाहतूक ठप्प- घटना घडताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. नांदगांव पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुरळकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर वाहनांची गर्दी कमी करून जखमी ऋषीकेशला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मनोजच्या कुटुंबियांना मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. नांदगांव पेठ पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
हेही वाचा-नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर