अमरावती - वर्धा नदीत बोट उलटून एकाच कुटुंबातील 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे सर्व लोक अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथील होते. दरम्यान, या घटनेतील तीन मृतदेह सापडले असून असून उर्वरित आठ जणांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
प्राथमिक माहितीनुसार एकाच कुटुंबातील अकरा नातेवाईक हे गाडेगाव येथील मते कुटुंबीयांकडे दशक्रिया विधीसाठी आले होते. काल (सोमवार) दशक्रिया कार्यक्रम आटोपल्यानंतर आज (मंगळवार) सकाळी दहा वाजताच्या सुमारास ते सर्व नातेवाईक महादेवाच्या दर्शनासाठी वर्धा नदीतून हे बोटीतून जात होते. मात्र अचानक बोट उलटली आणि अकरा जण बुडाले. यामध्ये बहिण, भाऊ, जावई असा एकमेकांचे नातेवाईक असलेल्या ११ जणांचा समावेश आहे. बोटीतील सर्वजण बुडाले असल्यामुळे अकराही जणांचा मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र शोधकार्य सुरु असून दुपारी एक पर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले. यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि एका चिमुकलीचा समावेश आहे. पोलीस व बचाव पथकाच्या मदतीने इतरांचा शोध सुरू आहे.