अमरावती -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावती जिल्हा आणि विभागाचा कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. येथील कोविड रुग्णालयाला भेट दिल्यावर त्यांनी अमरावतीत ऑक्सिजनची परिस्थिती कट टू कट असून काळजी घेण्याची गरज असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले.
सम प्रमाणात व्हावे लसींचे वितरण
अमरावतीत लसींचा तुडवडा जाणवतो आहे. राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला समप्रमाणात लसी पुरवल्या पाहिजेत. यासाठी लोकसंख्येचाही विचार व्हायला हवा. राज्यातील काही भागात जास्त आणि काही भागात कमी लसी असा प्रकार व्हायला नको आणि यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
डॉक्टरांचं अभिनंदन
अमरावतीत गत वर्षभरापासून कोविड रुग्णांसाठी सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे मी अभिनंदन करतो. डॉक्टर सातत्याने मेहनत करताहेत. ही लढाई अद्याप पुढेही राहणार असल्याने आणखी काही काळ तग धरावा अशी विनंती मी डॉक्टरांना केली असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्य शासनाने लसीकरणाचा वेग वाढवावा
केंद्र शासनाकडून सर्वाधिक लसींचा पुरवठा महाराष्ट्राला झाला आहे. आता 18 वर्षापासून वरच्या सगळ्यांना लस द्यायची आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकारने राज्य शासनाला मुभा दिली आहे. आपल्या देशात लसींची निर्मिती हळूहळू वाढते आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोविशिल्डची निर्मिती 10 कोटीपर्यंत जाणार आहे. कोवॅक्सिनचे उत्पादन 3 कोटीच्या वर जाणार आहे. ऑगस्टपर्यंत ते 6 कोटींवर जाईल. केंद्र सरकार आता 50 टक्के उत्पादन आपल्याकडे ठेवणार असून 50 टक्के लसी खरेदी करण्याची मुभा राज्यांना देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने आपला साठा बुक केला आहे. अशा परिस्थितीत आता राज्य शासनाने लसीकरणाचा वेग वाढवावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदींच्या विनंतीमुळे अमेरिकेकडून मदत
जग अडचणीत असताना भारताने मदत केली. आता भारत अडचणीत असल्याने मोदींनी अमेरिकेकडे मदतीसाठी विनंती केली. या विनंतीला मान देत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी लसीसाठी लागणारा कच्चा माल देण्यास तयारी दर्शवली असून त्यांच्याकडचा कच्चा माल, ऑक्सिजन सिलेंडर भारताला दिले असे फडणवीस म्हणाले.