महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उपकुलसचिवांनी विद्यापीठाला लावला 39 हजारांचा चुना; कुलगुरुंनी दिले चौकशीचे आदेश

महाविद्यालयीन विभागाच्या उपकुलसचिव सुलभा पाटील यांनी मंत्रालयात विद्यापीठाच्या कामानिमित्त नागपूर ते मुंबई असा तीन वेळा विमान प्रवास केला. हा प्रवास 2 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2017 या दिवाळीच्या सुट्टयादरम्यान झाला होता.

Sant Gadgebaba Amravati university
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

By

Published : Nov 28, 2019, 3:15 AM IST

अमरावती - प्रवास भत्त्याच्या नावाने पुन्हा एकदा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला चुना लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठाच्या उपकुलसचिव सुलभा पाटील यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये नागपूर ते मुंबई असा तीन वेळा विमानाने प्रवास केल्याचे दाखविले. यातून विद्यापीठाची 39 हजार 71 रुपयांची फसवणूक झाल्याचे सिनेटच्या बैठकीत बुधवारी उघडकीस आले.

महाविद्यालयीन विभागाच्या उपकुलसचिव सुलभा पाटील यांनी मंत्रालयात विद्यापीठाच्या कामानिमित्त नागपूर ते मुंबई असा तीन वेळा विमान प्रवास केला. हा प्रवास 2 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2017 या कालावधीत झाला होता. पाटील यांनी विद्यापीठाच्या कामासाठी नव्हेतर वैयक्तिक कामासाठी प्रवास केल्याचा आरोप दिलीप कडू यांनी सिनेटसमोर मांडला. त्यासाठीचे देयक विद्यापीठाकडून काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या हजेरीपत्रकासंदर्भात मंत्रालयात जावे लागले, असे कारण सुलभा पाटील यांनी दिले आहे. असे असताना आस्थापना विभागाचे ज्येष्ठ उपकुलसचिव प्रवीण राठोड यांनी पाटील या शिक्षकांच्या हजेरीपत्रकाच्यासंदर्भात मंत्रालयात गेल्याचे नमूद केले. उपकुलसचिव पाटील या नेमक्या शिक्षकांच्या की शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या रोस्टरसाठी मंत्रालयात गेल्या हे अस्पष्ट आहे.

सिनेट सदस्य दिलीप कडू

विशेष म्हणजे 20, 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या सुट्टी असताना त्या विद्यापीठाच्या कोणत्या कामासाठी मंत्रालयात होत्या, हा यक्षप्रश्नच असल्याचे कडू यांनी म्हटले. या गंभीर विषयाची चौकशी व्हावी, अशी मागणी दिलीप कडू यांनी सभागृहात केली. दिलीप कडू यांच्यासह प्रा. विवेक देशमुख, प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांनीही या गंभीर प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी रेटून धरली. या विषयात सभागृहाचे वातावरण तापले असताना कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीचा अहवाल सिनेटच्या पुढच्या सभेत ठेवण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी सभागृहाला दिले.


यापूर्वीही विद्यापीठाची झाली आहे फसवणूक
यापूर्वी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी बांधाबांध भत्त्याच्या नावाखाली विद्यापीठाकडून 75 हजार रुपये लाटले होते. तर माजी कुलसचिव प्रा. दिनेश जोशी यांनी स्वग्राम प्रवास योजनेच्या नावाखाली विद्यापीठाला हजारो रुपयांचा चुना लावला होता .या प्रकरणात दोघांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details