अमरावती -छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी 19 फेब्रुवारीला राजापेठ उड्डाणपूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसणारच, असे आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे आज (दि. 5 फेब्रुवारी) अमरावतीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राजापेठ उड्डाणपूल येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी रीतसर संपूर्ण परवानगी घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आता शासनाकडून कुठलाही अडथळा येऊ नये, असे निवेदनही आमदार राणा यांनी राज्यपालांना दिले आहे.
अर्ध्या तासासाठी राज्यपाल आले होते अमरावती -राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे दोन दिवसांच्या विदर्भ दौर्यावर आले होते. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास राज्यपाल वाशिम येथून अमरावती येथील शासकीय विश्रामगृह येथे पोहोचले. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर ( Guardian Minister Yashomati Thakur ) यांच्यासह संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. भाले, आमदार रवी राणा, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी नवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर आदी यावेळी उपस्थित होते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी यावेळी राज्यपालांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. सायंकाळी साडेपाच वाजता राज्यपालांच्या ताफा नागपूरकडे रवाना झाला.