अमरावती - पत्नी प्रियंका दिवाण हिच्या खुनाचा आरोप ( Priyanka Diwan Murder Case ) असलेला तिचा पती डॉ. पंकज दिवाण ( Pankaj Diwan Police Custody ) याला पुन्हा १३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, दिवाणच्या आईस न्यायालयीन कोठडी मिळाली. प्रियंका दिवाण खुनाचे रहस्य उलगडण्यासाठी त्याला वाढीव पोलीस कोठडी देण्यात यावी, असा युक्तीवाद गाडगेनगरचे निरीक्षक आसाराम चोरमले यांनी केला. यामुळे त्याला पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली.
20 एप्रिल रोजी प्रियंका दिवाण हिचा मृतदेह तिच्या पतीच्या राधानगरस्थित श्री साई हेल्थकेअर अँड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे संशयास्पद स्थितीत आढळला होता. तिने आत्महत्या केल्याचा दावा दिवाण कुटुंबीयांकडून, तर घातपाताची तक्रार प्रियंकाच्या पालकांकडून करण्यात आली. २७ एप्रिल रोजी शवविच्छेदन अहवाल व मृताच्या बहिणीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी डॉ. पंकज दिवाण, त्यांची आई व बहिणीविरुद्ध खून, खुनाचा पुरावा नष्ट करणे, फौजदारी स्वरूपाचा कटाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर डॉ. दिवाणला २९ एप्रिल रोजी त्याच्या आईसह ताब्यात घेण्यात आले. आजारपणामुळे सहा दिवस इर्विनमध्ये काढल्यानंतर ४ मे रोजी गाडगेनगर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. दिवाण माय-लेक ९ मेपर्यंत पोलीस कोठडीत होते. त्यांना ९ मे रोजी पुन्हा स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.