अमरावती -वडिलांची हत्या करणाऱ्या मुलास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र एम. जोशी यांच्या न्यायालयाने आज ( 9 मे ) आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना २२ जुलै २०२० रोजी सायंकाळी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहराबंदी येथे घडली होती. राजू मारोतराव पाचबुद्धे (४२) रा. पोहराबंदी, असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव ( Amravati District Court Man Gets Life Imprisonments )आहे.
न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार, घटनेच्या दिवशी २२ जुलै २०२० रोजी सायंकाळी पोहराबंदी येथील रहिवासी पार्वती मारोतराव पाचबुद्धे (६५) व त्यांचे पती मारोतराव चंपकराव पाचबुद्धे हे घराच्या आवारात बसले होते. यावेळी त्यांचा मुलगा राजू हा मद्यधुंद अवस्थेत तेथे आला. त्याने आई-वडिलांना शिवीगाळ केली. गेल्या वर्षभरापासून अमरावतीत राहत असलेली पत्नी व मुले यांना आणून द्या; नाही तर तुमचा जिव घेतो, असे म्हणून राजूने वडील मारोतराव यांच्यावर लोखंडी टोकदार वस्तूने हल्ला केला. या हल्ल्यात मारोतराव गंभीर जखमी झाले. हा प्रकार लक्षात आल्यावर शेजाऱ्यांनी मारोतराव यांची राजूच्या तावडीतून सुटका केली. त्याचवेळी राजू तेथून पळून गेला.
वडिलांचा उचारादरम्यान मृत्यू -त्यानंतर मारोतराव यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पार्वती यांच्या तक्रारीवरून आरोपी राजूविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, २९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात मारोतराव यांचा २३ जुलै २०२० रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात भादंविच्या कलम ३०२ नुसार वाढ केली. पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
9 साक्षीदारांनी नोंदविली साक्ष - या प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र एम. जोशी यांच्या न्यायालयात 9 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. साक्षीदारांची साक्ष आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्या. रवींद्र एम. जोशी यांच्या न्यायालयाने आरोपीला राजू पाचबुद्धे याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पंकज रामेश्वर इंगळे यांनी यशस्वी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून देवराव डकरे व अरुण हटवार यांनी कामकाज पाहिले.
हेही वाचा -NIA Raid In Mumbai : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित 20 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी; तिघेजण ताब्यात