अमरावती - 20 वर्षांपासून सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा दुर्दैवी ठपका बसलेल्या पश्चिम विदर्भात आजही शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. कोरोनाकाळातही पश्चिम विदर्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती विभागात 1 हजार 357 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
प्रतिनिधींनी घेतलेला आढावा हेही वाचा -Maha Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरणार - आशिष शेलार
2019 ते मे 2021 या कोरोनाकाळात अमरावती विभागात सर्वाधिक 790 शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या आहेत. याच काळात अमरावती जिल्ह्यात 637 शेतकऱ्यांनी स्वतःचे जीवन संपवले आहे. अकोला जिल्ह्यात 331, वाशीम जिल्ह्यात 220 आणि बुलडाणा जिल्ह्यात 656 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.
- ही आहेत आत्महत्येची कारणं-
शेतात पीक बहरले असताना अवकाळी पाऊस होणे आणि हातचे पिकं वाया गेल्याने अनेक शेतकरी खचून गेले. विभागातील महत्वाच्या सोयाबीन पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला. जे पिकं हाती आले त्यांना भाव न मिळाल्याने शेतीसाठी घेतलेलं कर्ज फेडणे, कुटुंबाचे पोषण करणे अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कोरोनाकाळात शेतकऱ्यांसमोरील संकट अधिक गडद झाले.
- विभागीय आयुक्त म्हणतात कोरोना हे कारण नाही-
शेतकऱ्यांची आत्महत्या ही दुर्दैवी बाब असून, शेतकऱ्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी शासन सर्व प्रयत्न करत आहे. आता कोरोनाकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या हे म्हणणे योग्य नसल्याचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले. या भागात अनेक वर्षापासून कर्जबाजरीपणा, पिकांना अत्यल्प हमीभाव, आर्थिक संकट याच कारणांमुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना असे पाऊल उचवण्यापासून रोखण्यास शासनाच्यावतीने आणखी प्रयत्न केले जातील, असेही पियुष सिंह म्हणाले.
- आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना 1 लाखाची मदत -
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. 21 वर्षात अमरावती विभागात 16 हजार 728 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी शासनाकडून मदत मिळण्यास केवळ 8 हजार 519 कुटुंब पात्र ठरले आहेत.
हेही वाचा -#Cylinder man : गॅसवाला कसा बनला "सिलिंडर मॅन"? जाणून घ्या...