मुंबई :एसबीआयच्या अध्यक्षांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, अदानी समूहाला त्यांच्या कर्जाच्या रकमेची पूर्तता करण्यासाठी कोणतेही मोठे आव्हान आहे असे आम्हाला वाटत नाही. ते म्हणाले की, आम्ही समभागाच्या बदल्यात कोणतेही कर्ज दिलेले नाही. एसबीआयने दिलेल्या एकूण कर्जांपैकी अदानींच्या कर्जाचा वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे ०.९ टक्के आहे, असेही त्यांनी सांगितले. हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअरच्या किमती घसरायला लागल्या आहेत. मात्र, फिच रेटिंग एजन्सीने कंपनीला दिलासा देणारा अहवाल दिला आहे. मूडीजने आपल्या अहवालात असेही म्हटले आहे की, अदानी समूहाला एक-दोन वर्षे समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने शुक्रवारी सांगितले की, त्यांनी अदानी समूहाच्या कंपन्यांना सुमारे 27,000 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे, जे एकूण वितरित कर्जाच्या केवळ 0.9 टक्के आहे. अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, अदानी समुहाला कर्जाची जबाबदारी पार पाडण्यात कोणतेही आव्हान येत असल्याचे बँकेला वाटत नाही. यासोबतच एसबीआयने या समूहाला शेअर्सच्या बदल्यात कोणतेही कर्ज दिलेले नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र हिंडेनबर्गचे दावे खरे ठरल्यास बँकेला मोठा फटका बसणार असे तज्ज्ञांचे मत आहे.
खारा म्हणाले की, अदानी समूहाच्या प्रकल्पांना कर्ज देताना भौतिक मालमत्ता आणि योग्य रोख प्रवाह लक्षात ठेवण्यात आला आहे. यासोबतच या समूहाचा थकीत कर्ज फेडण्याचा विक्रमही चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांत अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या मोठ्या घसरणीचा फटका कर्ज देणाऱ्या संस्थांना बसू शकतो, या भीतीने समूहाने कर्जाचे पुनर्वित्त करण्याची कोणतीही विनंती केलेली नाही, असे एसबीआयचे प्रमुख म्हणाले.