मुंबई - राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच एनएसईच्या (NSE) कामकाजात तांत्रिक अडचण आल्याने कामकाज खोळंबले आहे. शेअर बाजाराद्वारे क्षणाक्षणाला ताजे अपडेट दिले जातात. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे 'निफ्टी' निर्देशांकाची आकडेवारी अपडेट होणे थांबले आहे. स्पॉट निफ्टी आणि बँक निफ्टीची आकडेवारी अपडेट होण्यास अडचण आली आहे.
शेअर बाजाराची आकडेवारी आणि माहिती व्यावसायिक आणि गुंतवणुकदारांना दाखविण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजाराकडून टेलिकॉम कंपन्यांची सेवा घेतली जाते. या सेवेच्या लिंकमध्ये तांत्रिक अडचण आली आहे. त्यामुळे एनएसई अपडेट होणे थांबले आहे. एनएसईने ट्विटरद्वारे याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
ट्विट करून दिली माहिती -
लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. तांत्रिक अडचण पाहता आज सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी सर्व प्रकारची माहिती देणे बंद ठेवले आहे. लवकरच अडचण दूर केली जाईल, असे ट्विट एनएसईने केले आहे.
११ क्षेत्रातील निफ्टी निर्देशांकाचे काम ठप्प -
निफ्टी ५० निर्देशांक कालपेक्षा( मंगळवार) ११३ अंकांनी वधारून १४ हजार ८२० अंकांवर स्थिरावला आहे. तर आज सकाळी सव्वादहापासून बँक निफ्टी १.४५ अंकांनी वधारून ३५ हजार ६२६.६० अंकांवर स्थिरावला आहे. मात्र, निफ्टी आणि निफ्टी बँक फ्युचर्सच्या किंमती विना अडथळा अपडेट होत आहेत. एकून ११ क्षेत्रातील निफ्टी एनएसईकडून दिले जातात. या सर्व अकरा क्षेत्रातील माहिती अद्यायावत होणेही तांत्रिक अडचणीमुळे थांबले आहे.