मुंबई – सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) भविष्यातील सौद्यासाठी चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. सप्टेंबरच्या सौद्यासाठी चांदीचा दर प्रति किलो 74 हजार 350 रुपये आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने चांदीचे दर वाढले आहे.
मागील सत्रात चांदीचा दर प्रतिकिलोला सर्वाधिक 73 हजार 600 रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो 2 हजार 139 रुपयांनी वधारून 74,032 रुपयांवर पोहोचला आहे.
बाजार विश्लेषकांच्या मते, औद्योगिक क्षेत्र आणि गुंतवणुकीसाठी चांदीची मागणी वाढली आहे. पेरू देशामधील खाणींमधून चांदीचे जगात दुसऱ्या क्रमांकावर उत्पादन होते. मात्र, कोरोनामुळे टाळेबंदी सुरू असल्याने पेरुकडून होणाऱ्या चांदीच्या पुरवठ्यात एक तृतीयांश घसरण झाली आहे.
अँजेल ब्रोक्रिंग्जचे डीव्हीपी अनुज गुप्ता म्हणाले, की भविष्यातील सौद्यात चांदीचे दर ऑगस्टमध्ये प्रति किलो 76 हजार ते 78 हजार रुपये होण्याची शक्यता आहे, तर अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चितता असल्याने सोन्याचा दर प्रतितोळा हा 55 हजार 540 रुपये होईल, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला.
गुंतवणुकीबरोबर सोन्याच्या रोख्यांमध्येही गुंतवणूक वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून भविष्यातील सौद्यांमध्ये सोन्याचे जागतिक तसे देशातील बाजारात दर वाढल्याचे विश्लेषकांनी सांगितले.