मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर ३.० या पॅकेजनंतरही शेअर बाजारात निरुत्साह आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात २५० अंशाने घसरला. एचडीएफसी ट्विन्स, आयसीआयसीआय बँक, कोटक बँकेच्या शेअरमध्ये घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजार सकाळच्या सत्रात २५१.४४ अंशाने घसरून ४३,१०५.७५ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ६८.९५ अंशाने घसरून १२,६२१.८५ वर पोहोचला.
या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर-
इंडसइंड बँकेचे सर्वाधिक ३ टक्क्यांनी शेअर घसरले. त्यापाठोपाठ एसबीआय, एल अँड टी, अॅक्सिस बँक, एचडीएफसी ट्विन्स, कोटक बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर घसरले. एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, टायटन, बजाज, फायनान्स आणि सन फार्माचे शेअर वधारले. मागील सत्रात शेअर बाजार २३६.४८ अंशाने घसरून ४३,३५७.१९ वर स्थिरावला होता. तर निफ्टीचा निर्देशांक ५८.३५ अंशाने घसरून १२,६९०.८० वर स्थिरावला होता. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी गुरुवारी १,५१४.१२ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
दरम्यान, औद्योगिक उत्पादनात सहा महिन्यानंतर वाढ झाली आहे. खाण आणि उर्जा क्षेत्रातील उत्पादनात वाढ झाल्याने देशातील एकूण औद्योगिक उत्पादन वाढले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख यश महाजन म्हणाले, की औद्योगिक उत्पादन निर्देशांकात सप्टेंबरमध्ये ०.२ टक्के वाढ झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना काही देशात पुन्हा टाळेबंदी होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक मंचावर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १.५९ टक्क्यांनी घसरून ४२.८४ डॉलर आहेत.
काय जाहीर केले आहे आर्थिक पॅकेज?
दिवाळी सणापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारत रोजगार पॅकेज ३.० गुरुवारी जाहीर केले. यावेळी जाहीर केलेल्या १२ आर्थिक उपाय योजनांमधून २.६५ लाख कोटींचे आर्थिक प्रोत्साहन मिळेल, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.