नवी दिल्ली -लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागणार असल्याने सेबी आणि शेअर बाजार यंत्रणा सतर्क झाली आहे. शेअर बाजाराच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी देखरेख करणाऱ्या यंत्रणेसह इतर उपाययोजनात वाढ करण्यात आली आहे.
लोकसभा मतदान निकालाच्या बहुतांश अंदाजात पुन्हा एनडीए सरकारच सत्तेत येणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकाने विक्रमी उसळी घेतली होती.
गुरुवारी मतदानाचा निकाल जाहीर होणार असल्याने शेअर बाजारातील देखरेख आणि नियमन करणाऱ्या यंत्रणेत वाढ करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या उपाययोजनेमुळे शेअर बाजारातील ढवळाढवळ आणि चढ-उताराचे प्रमाण कमी होण्यासाठी मदत होणार आहे.
निफ्टी आणि सिंगापूर शेअर बाजारातील हालचालींवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. कारण सिंगापूर शेअर बाजाराचा व्यवहार हा भारतीय शेअर बाजारापूर्वी सुरू होतो. त्याचा भारतीय शेअर बाजारावरही प्रभाव असतो. गुरुवारी शेअर बाजार अस्थिर राहणार असल्याचा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे.