नवी दिल्ली - आझादपूर भाजीमंडईत कांद्याला प्रति किलो ३७.५० ते ११२.५० रुपये आज भाव मिळाला आहे. हा चालू वर्षातील विक्रमी भाव आहे. त्यामुळे किरकोळ बाजारपेठेत कांद्याचा दर प्रति किलो २०० रुपयांहून अधिक होणार असल्याची शक्यता आहे.
जर अफगाणिस्तानहून येणाऱ्या कांद्याची आवक झाली नाही तर कांदा प्रति किलो २०० रुपयांहून होईल, अशी शक्यता आझादपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यक्त केली. विविध राज्यांतून बाजारपेठेत येणाऱ्या कांद्याची आवक कमी झाल्याचे एपीएमसीने म्हटले आहे.
दिल्लीमध्ये सोमवारी कांद्याचा दर प्रति किलो १०० ते १५० किलोपर्यंत पोहोचला होता. येत्या काही दिवसांत काद्यांचे दर आणखी वाढतील अशी शक्यता व्यापारी करत आहेत.
लांबलेल्या पावसामुळे कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. विदेशातून आयात केलेल्या २७९.१ टन कांद्याची दिल्लीमध्ये आवक झाली आहे. कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा म्हणाले, तर विविध राज्यांमधून ५५६.५ टन कांद्याची दिल्लीमधील बाजारपेठेत आवक झाली आहे. चांगले हवामान राहिले तर कांद्याचा पुरवठा वाढेल.