नवी दिल्ली- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने देशात चिंतेचे वातावरण आहे. दुसरीकडे शेअर बाजार गुंतवणूकदारांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. गुंतवणूकदारांनी गेल्या दोनच दिवसात ९.७४ लाख कोटी रुपये गमाविले आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात वधारला होता. मात्र, शेअर बाजार बंद होताना ८१०.९८ अंशांनी पडझड होवून निर्देशांक ३०,५७९.०९ वर स्थिरावला. तर सोमवारी शेअर बाजार निर्देशांक २,७१३.४१ अंशांनी घसरला होता.
जागतिक आर्थिक मंचावरील नकारात्मक स्थितीने मुंबई शेअर बाजारात घसरण सुरू आहे. जगभरातील शेअर बाजारांमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. आर्थिक प्रोत्साहनात्मक देण्यात येणाऱ्या सुधारणा अपयशी ठरल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने जागतिक मंदी येईल, अशीही गुंतवणूकदारांना भीती आहे.