नवी दिल्ली- सोन्याचा दर नवी दिल्लीत प्रति तोळा 241 रुपयांनी वाढून 50,425 रुपये आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमती वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा 50,184 रुपये होता. चांदीचा दर प्रति किलो 161 रुपयांनी वाढून 62,542 रुपये आहे. तर मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 62,381 रुपये होता. धनत्रयोदशी हा सण सोने व चांदीच्या खरेदीसाठी शुभ मानला जातो. त्यामुळे प्रमुख महानगरांमधील शहरात सोने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे ग्राहकांची दरवर्षीप्रमाणे धनत्रयोदशीला होणारी गर्दी यंदा नसल्याचे सराफ व्यवसायिकांनी सांगितले.
कोरोनाची लस बाजारात येण्याच्या आशेने सोन्याच्या किमती स्थिर-
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दामानी म्हणाले, की कोरोना महामारीचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अशात कोरोनाची लस तयार होण्याची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. अमेरिकेच्या काही राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. त्यामुळे बाजारात खूप मोठ्या प्रमाणात तणाव असल्याचेही दामानी यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील जळगावात सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
सोन्याचा दर आज 51 हजार 300 प्रती तोळा तर, चांदीचा दर 66 हजार 500 प्रती किलो होता. हा दर कमी झाल्याने अनेकांनी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी केले. सोबत विविध प्रकारची आकर्षक फॅन्सी दागिन्यांची नागरिकांकडून खरेदी करण्यात आली, अशी माहिती जळगावातील आर. सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी दिली.