नवी दिल्ली - सोन्याचे दर प्रति तोळा (१० ग्रॅम) १९८ रुपयांनी वाढून ४८,४८० रुपये आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारत मौल्यवान धांतुचे दर वाढल्यानंतर देशात सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोन्याचा दर प्रति तोळा ४८,२८२ रुपये होता. सोन्यापाठोपाठ चांदीचा दर प्रति किलो १,००८ रुपयांनी वाढून ६५,३४० रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६४,३३२ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर प्रति औंस १,८४३ डॉलरने तर चांदीचे दर प्रति औंस २५.२८ डॉलरने वाढले आहेत.
हेही वाचा-व्हॉट्सअपने गोपनीयतेचे धोरण मागे घ्यावे; केंद्राची कंपनीला सूचना
जागतिक बाजाराचा सोन्यासह चांदीच्या दरावर होतो परिणाम-
दरम्यान, सोन्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. कोरोना महामारीच्या अस्थिरतेत गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये अधिक प्रमाणात गुंतवणुकीला प्राधान्य दिले होते. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेची परिस्थिती पाहता गुंतवणूकदार गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि योग्य परतावा या दोन बाबींचा विचार करतात. त्यानंतर सोने आणि चांदी खरेदी व विक्रीला प्राधान्य देत आहेत. दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय बाजाराचा कल बदलत आहे. त्यामुळे सोने व चांदीचे दर अस्थिर आहेत.
हेही वाचा-पेट्रोल मुंबईत प्रति लिटर ९२ रुपयांच्या घरात; सामान्यांच्या खिशाला झळ
दरम्यान, केंद्रीय महसूल विभागाने सोने खरेदीवरील नियम शिथील केले आहेत. सोने, चांदी, दागिने आणि रत्ने आणि खड्यांची खरेदी २ लाखांहून कमी असेल तर ग्राहकाला आधार कार्ड किंवा इतर केवायसी कागदपत्रांची पूर्वीप्रमाणे गरज भासणार नाही.