नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिसऱ्या टप्प्यातील आर्थिक पॅकेजमध्ये कृषी सुधारणांवर भर दिला आहे. या पॅकेजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. तर कृषी उद्योगजगताने कोरोनाचे संकट हे शेतकऱ्यांसाठी संधी ठरू शकते, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक पॅकेजवर प्रतिक्रिया देताना म्हटले, की या पॅकेजमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत होणार आहे. पॅकेजमुळे कष्टकरी शेतकरी, मच्छीमार, पशुसंवर्धन आणि दुग्धोत्पादन क्षेत्राला मदत होणार आहे.
कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी म्हणाले, की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या ११ सुधारणांपैकी ३ प्रशासकीय सुधारणा सर्वात महत्त्वाच्या आहेत. हे पहिल्यांदाच मोदी सरकारच्या काळात होत आहे. शेवटच्या तीन सुधारणांनी उद्दिष्ट पूर्ण होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.