नवी दिल्ली - 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२०' ची छपाई प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी आज पंरपरेनुसार हलवा समारंभाचे आयोजन करण्यात आले. नॉर्थ ब्लॉकमधील समारंभात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्तीय अधिकाऱ्यांना हलव्याचे वाटप केले. त्यानंतर अर्थसंकल्प छपाईसाठी रवाना करण्यात येणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते हलवा समारंभाची वित्तीय मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये सुरुवात करण्यात आली. यावेळी पंरपरेनुसार मोठ्या कढईत हलवा तयार करण्यात आला. सीतारामन यांनी केंद्रीय राज्य अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह वित्त मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हलव्याचे वाटप केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
हेही वाचा-जागतिक आर्थिक मंचात केंद्रीय वाणिज्य मंत्री भारतीय प्रतिनिधींचे करणार नेतृत्व
जाणून घ्या काय आहे, हलवा समारंभ-
हलवा समारंभानंतर अर्थसंकल्पाशी निगडीत असलेले वित्तीय मंत्रालयातील अधिकारी हे एकांतवासात राहतात. अर्थसंकल्प सादर करेपर्यंत त्यांना कुटुंबाबरोबर संपर्क ठेवण्यासही परवानगी नसते. या कालावधीत त्यांना जवळच्या व्यक्तींशी फोन अथवा मोबाईल तसेच ई-मेलने संपर्क ठेवता येत नाही. केवळ अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी असते. यामागे अर्थसंकल्प गोपनीय ठेवणे हा उद्देश असतो.