हैदराबाद - कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक आर्थिक वाढ नोंदवण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अत्यंत कडक निर्बंध नसल्यामुळे ही वाढ शक्य झाल्याचे म्हटलं जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कामकाज सुरू होते. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत निर्बंध कमी असल्याने हे शक्य झाले, असे मत इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चचे प्रमुख अर्थतज्ज्ञ सुनील सिन्हा यांनी व्यक्त केले.
काही अर्थतज्ज्ञांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दर कमी होण्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, तसे झाले नाही. पुरवठ्याच्या दृष्ट्रीकोनातून पाहिले तर कृषी क्षेत्रात चांगली कामगिरी राहिली. कारण, कृषी क्षेत्राने 4.5% ऐवढी मजबूत वाढ नोंदवली. गेल्या वर्षी जेव्हा संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये होता. तेव्हा कृषी क्षेत्राने 3.5% ची वाढ नोंदवली होती.
सिन्हा यांच्या मते, कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्थेतील उभारी देणारी एकमेव आशा म्हणून कृषी क्षेत्राकडे पाहिले जात होते. त्या कृषी क्षेत्राला औद्योगिक क्षेत्राने मागे टाकले. देशात कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 4,38,000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर जगभरात 4.5 मिलियनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात औद्योगिक क्षेत्रात 46 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. निर्माण (68.3%), उत्पादन (49.6%), खनन(18.6%), वीज आणि उपयुक्तता सेवा (14.3%) यासारख्या क्षेत्रांमध्ये वाढ नोंदवली गेली. सिन्हा हे देखील नमूद करतात, की सेवा क्षेत्र हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा घटक अजूनही दबावाखाली आहे. यामध्ये केवळ एप्रिल-जून कालावधीत केवळ 11.4 टक्के वाढ झाली. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याच्या अवस्थेत आहे. अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी भविष्यात वित्तीय आणि आर्थिक धोरणाची गरज असल्याचे इंडिया रेटिंग्स आणि रिसर्चने म्हटलं.
हेही वाचा -'या' राज्यातील शाळा आजपासून उघडणार