मुंबई -भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून सुरू झाली आहे. किरकोळ बाजारपेठेत महागाई वाढत असल्याचे पाहता आरबीआयकडून रेपो दर 'जैसे थे' ठेवले जाण्याची शक्यता आहे. आरबीआय ४ डिसेंबरला रेपो दर जाहीर करणार आहे.
आरबीआयने ऑक्टोबरमध्ये रेपो दर हा जैसे थे ठेवला होता. नुकतेच किरकोळ बाजारपेठेत महागाईचे प्रमाण हे ६ टक्क्यांहून अधिक आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षात विकासदर हा ९.५ टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज केला आहे. चालू आर्थिक वर्षात फेब्रुवारीत आरबीआयने रेपो दरात ११५ बेसिस पाँईटने कपात केली आहे.
हेही वाचा-ईटीव्ही विशेष :दुसऱ्या तिमाहीत जीडीपीत सात टक्क्यांची घसरण; जाणून घ्या, तज्ज्ञांची मते
ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई वाढत असल्याने आरबीआय रेपो दरात कपात करणार नाही, असे तज्ज्ञांते मत आहे. येस सिक्युरिटीजचे वरिष्ठ अध्यक्ष अमर अंबानी म्हणाले, की जीडीपीच्या आकडेवारीवरून देशाची अर्थव्यवस्था पुन्हा सावरत असल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारपेठेतील महागाईचे प्रमाण अधिक आहे. डिसेंबर २०२० मध्ये आरबीआयकडून रेपो दर स्थिर राहण्याची अपेक्षा आहे. तर फेब्रुवारी २०२१ मध्ये रेपो दर २५ बेसिस पाँईटने कमी करण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा-दिलासादायक! सलग दुसऱ्या महिन्यात जीएसटी संकलन १ लाख कोटी रुपयांहून अधिक
दुसऱ्या तिमाहीत जीडीपी उणे ७.५ टक्के
कोरोना महामारीचा फटका बसलेली अर्थव्यवस्था काहीअंशी सावरत आहे. असे असले तरी जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत पहिल्या तिमाहीच्या तुलनेत देशाच्या विकासदरात ७.५ टक्के घसरण म्हणजे उणे ७.५ टक्के विकासदर राहिला आहे. या घसरणीने देशात आर्थिक मंदी असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. एप्रिल-जुनच्या तिमाहीत विकासदरात २३.९ टक्के घसरण झाली होती.