नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर सत्तेत येणाऱ्या एनडीए सरकारला मंत्रिमडळाची फेरनिवड करावी लागणार आहे. नव्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या जागी सध्याचे असलेले रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची अर्थमंत्री म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
अरुण जेटली नव्हे 'हे' होऊ शकतात नव्या सरकारमध्ये केंद्रीय अर्थमंत्री
प्रकृतीच्या कारणामुळे जेटलींनी केंद्रीय अर्थमंत्री पद स्विकारले नाही तर पदाचा अनुभव असलेला व्यक्ती म्हणून गोयल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
गतवर्षी अरुण जेटली हे प्रकृति अस्वास्थामुळे अमेरिकेत उपचारासाठी गेले असताना पियूष गोयल यांनी प्रभारी अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. प्रकृतीच्या कारणामुळे जेटलींनी केंद्रीय अर्थमंत्री पद स्विकारले नाही तर पदाचा अनुभव असलेला व्यक्ती म्हणून गोयल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण अर्थव्यवस्था मंदावली असताना सरकारची चिंता वाढली आहे. अशा स्थितीत मोदी सरकार नवा चेहरा देण्याबाबत विचार करणार नाही. यापूर्वी गोयल यांनी केंद्रीय अर्थमंत्री म्हणून अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता.
गाझियापूरमधून (पूर्व) केंद्रीय दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांना पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे या पदावर प्रसाद यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सध्याचे कायदा आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पूर्वीच्या सरकारमध्ये दूरसंचार मंत्रालयाचा कारभार सांभाळला होता. त्यांना पुन्हा दूरसंचार मंत्रालयाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. बिहारच्या पाटणा साहिब लोकसभा मतदारसंघातून रविशंकर प्रसाद यांनी भाजपचे माजी नेते, काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांचा पराभव केला आहे. दरम्यान नव्या सरकारच्या मंत्रिमडळाच्या स्थापनेबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही.