मुंबई- मोदी सरकारने पायाभूत प्रकल्पांसाठी १०२ लाख कोटी खर्च करण्याची घोषणा केली. येत्या पाच वर्षात ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी या पायाभूत प्रकल्पांचा उपयोग होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
पायाभूत क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली होती. या टास्क फोर्सने ७० भागीदारांशी चार महिन्यांच्या अल्पकालावधीत चर्चा करून विविध प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. पायाभूत प्रकल्पांच्या विकासासाठी आणखी ३ लाख कोटी रुपये गुंतविणार आहेत. पायाभूत क्षेत्राच्या प्रकल्पाचा केंद्र सरकार व राज्य सरकार प्रत्येकी ३९ टक्के खर्च उचलणार आहे. तर २२ टक्के खर्च खासगी क्षेत्राकडून करण्यात आहे. हे पायाभूत प्रकल्प उर्जा, रेल्वे, शहरी सिंचन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रात असणार आहेत.
पायाभूत क्षेत्रात १०२ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प केल्याने देशाची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५ लाख कोटी डॉलरची होण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीय पायाभूत प्रकल्पाने नोकऱ्या, जीवनाला अनुकूल सुधारणा, सर्वांना पायाभूत क्षेत्राचा समान वापर करण्याची संधी व सर्वसमावेशक प्रगती करणे शक्य होणार आहे. २५ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. तर २० लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. तर १४ लाख कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहे. अपांरपरिक ऊर्जा क्षेत्र, रेल्वे, शहर विकास, पाणी, डिजीटल, आरोग्य अशा क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार आहे.
हेही वाचा-सायरस मिस्त्री प्रकरण : रतन टाटा यांची सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका
औद्योगिक उत्पादनात घसरण-
सलग चौथ्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये पायाभूत क्षेत्राच्या उत्पादनाचा वृद्धीदरात घसरण झाली आहे. नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनाच्या पायाभूत ८ क्षेत्राच्या वृद्धीदरात १.५ टक्के घसरण नोंदविण्यात आली आहे. तर पाच पायाभूत क्षेत्राचा वृद्धीदर हा उणे राहिला आहे. एप्रिल-नोव्हेंबरमध्ये पायाभूत क्षेत्राचा वृद्धीदर हा जैसे थे (शून्य टक्के) राहिला आहे. तर गतवर्षी पायाभूत क्षेत्राचा वृद्धीदर हा ५.१ टक्के होता. गतवर्षी ऑगस्टपासून आठ मूलभूत क्षेत्रांचा वृद्धीदर हा उणे राहिला आहे.