मुंबई - दृष्टीहीनांना नोटांची सत्यता पडताळण्यासाठी आरबीआय अॅप उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागणार नसल्याचे आरबीआयने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले.
नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाईंडने (एनएबी) नव्या नोटा आणि नाणी ही दृष्टीहीनांना ओळखणे कठीण जात असल्याने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणीत बीटा अॅप हे १ नोव्हेंबरला उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयचे वकील व्यंकटेश धोंड यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. त्या अॅपबाबत संबंधित पक्षाकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर अंतिम अॅप उपलब्ध केले जाणार आहे. काश्मीरमध्ये इंटरनेटवर निर्बंध आणण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अॅपचा कसा वापर होणार आहे, याबाबत न्यायालयाने आरबीआयच्या वकिलांना विचारणा केली.
हेही वाचा-'आरसीईपी' बैठकीच्या तयारीबाबत वाणिज्य मंत्रालय पंतप्रधानांना आज देणार सादरीकरण
नव्या २०, १०, २ आणि १ रुपयाच्या नाण्यांवर विशेष खूण असल्याचे सरकारच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. दृष्टीहीनांना ती नाणे ओळखता येतील, असे सरकारच्यावतीने वकिलांनी सांगितले. ही नवी नाणी नोव्हेंबरमध्ये बाजारात येणार असल्याचेही सांगण्यात आले. ही नाणी तपासणीसाठी न्यायालयासमोर सादर करण्यात आली. यावेळी काही दृष्टीहीन याचिकाकर्तेदेखील न्यायालयात उपस्थित होते.