नवी दिल्ली - टाळेबंदीच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेसह कोरोनाविरोधातील लढा सुरू ठेवण्याला महत्त्व द्यावे लागेल, असे मुख्यंमत्र्यांना सांगितले. पंतप्रधानांनी टाळेबंदीत २२ मार्चनंतर मुख्यमंत्र्यांशी चौथ्यांदा संवाद साधला आहे.
राज्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे कठोरपणे पालन करावे, असे पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. पुढे ते म्हणाले, की टाळेबंदीमुळे सकारात्मक परिणाम झाला आहे. गेल्या दीड महिन्यात हजारो जणांचे जीव वाचू शकले आहेत. सध्या, देशाने दोन टाळेबंदी पाहिल्या आहेत. दोन्ही 'टाळेबंदी वेगळ्या आहेत. आता, आपल्या पुढील विचार करायचा आहे. काही तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचा परिणाम हा येत्या महिन्यांमध्ये दिसणार आहे. मास्क हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याची प्रत्येकाने खात्री द्यायला हवी.