मुंबई- कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चालू आर्थिक वर्षात देशाचा सकल उत्पन्नाचा दर उणे राहील, असा अंदाज केला आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशाचे आर्थिक चलनवलन विस्कळित झाल्याचे दास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, की जागतिक अर्थव्यवस्था ही मंदीच्या दिशेने जात आहे. महागाईचे स्वरुप ही अनिश्चित आणि अधिक आहे. गेली दोन महिने टाळेबंदी असल्याने देशातील चलनवलनावर परिणाम झाला आहे. देशात औद्योगिकीकरणात आघाडीवर असलेल्या सहा राज्यांचा औद्योगिक उत्पादनात ६० टक्के वाटा आहे. या राज्यांचा मोठा हिस्सा हा कोरोनाबाधित असलेल्या रेड आणि ऑरेंज क्षेत्रात आहे.
मोठ्या प्रमाणात मागणी घसरल्याचे चिन्हे दिसत आहेत. तसेच विद्युत निर्मिती आणि पेट्रोलियम उत्पादनाच्या मागणीत घसरण झाली आहे. देशातील उपभोक्त्याच्या प्रमाणात ६० टक्के घसरण झाल्याचे आरबीआय गव्हर्नर दास यांनी सांगितले.
हेही वाचा-आरबीआयकडून दिलासा; कर्जदारांना पैसे भरण्याकरता आणखी तीन महिन्यांची मुदत