नवी दिल्ली- केंद्र सरकारने आर्थिक सुधारणांच्या घोषणा करूनही औद्योगिक उत्पादनातील घसरण सुरुच राहिली आहे. देशातील मुख्य आठ क्षेत्रांच्या उत्पादनात ऑगस्टमध्ये ०.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. ही आकडेवारी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केली.
मुख्य आठ क्षेत्रात कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीजनिर्मिती या क्षेत्राचा समावेश आहे.
हेही वाचा-ऑस्ट्रेलियाच्या 'या' राज्यात कार्यालय असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ठरली पहिली बँक
अशी झाली ऑगस्टमध्ये घसरण
- कोळसा - ८.६ टक्के
- खनिज तेल - ५.४ टक्के
- नैसर्गिक वायू - ३.९ टक्के
- सिमेंट - ४.९ टक्के
- वीजनिर्मिती - २.९ टक्के
खतांच्या उत्पादनात २.९ टक्के तर स्टीलच्या उत्पादनात ५ टक्के वृद्धी झाली आहे. एप्रिल-ऑगस्ट या कालावधीत मुख्य आठ क्षेत्रांमधील उत्पादनांचा वृद्धी दर हा २.४ राहिला आहे. तर गेल्या वर्षी मुख्य आठ क्षेत्रांचा वृद्धी दर हा ५.७ टक्के होता.
हेही वाचा-भारतीय रिझर्व्ह बँक सलग पाचव्यांदा ४ ऑक्टोबरला रेपो दरात कपात करण्याची शक्यता
मुख्य आठ क्षेत्रांचा औद्योगिक उत्पादनात एकूण सुमारे ४०.२७ टक्के वाटा आहे. त्यामुळे मुख्य आठ क्षेत्रातील घसरणीने औद्योगिक उत्पादनात घसरण सुरुच राहिल्याचे दिसून आले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ५ टक्के राष्ट्रीय सकल उत्पन्नाची (जीडीपी) नोंद झाली. हे गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी राष्ट्रीय सकल उत्पन्नाचे प्रमाण आहे.