नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन दुसऱ्यांदा अर्थसंकल्प शनिवारी सादर करणार आहे. गतवर्षी अंतरिम अर्थसंकल्पात निश्चित केलेल्या उद्दिष्टाप्रमाणे महसुलाचे कर संकलन झालेले नाही. नुकतेच सरकारने दिलेल्या आकडेवारीप्रमाणे चालू वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात (एप्रिल ते नोव्हेंबर) दरम्यान ७.५ लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले आहे. हे कर संकलन अर्थसंकल्पाच्या उद्दिष्टाच्या ४५.५ टक्के आहे. अर्थसंकल्पात चालू आर्थिक वर्षात १६.५ लाख कोटींचे कर संकलन होईल, असे उद्दिष्ट निश्चित केले होते.
दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेच्या कठीण काळात देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांना जबाबदारी दिली. निकटवर्तीय मानले जाणारे अरुण जेटली यांचे निधन झाल्यानंतर मोदींनी सीतारामन यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पदावर निवड केली. मात्र, दुसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अर्थव्यवस्थेची स्थिती अधिकच खराब होत गेली आहे.
आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या शेवटच्या तिमाहीत राष्ट्रीय सकल उत्पादन (जीडीपी) घसरून ५.८ झाले. त्यानंतर आर्थिक वर्ष २०१९-२० च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जूलै) जीडीपी घसरून ५ टक्के झाला आहे. तर दुसऱ्या तिमाहीत (जूलै-सप्टेंबर) जीडीपी घसरून ४.५ टक्के झाला. हे जीडीपीचे प्रमाण आर्थिक वर्ष २०१२-१३ च्या शेवटच्या तिमाहीनंतर (जानेवारी-मार्च) सर्वात कमी राहिले आहे. तसेच निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या अंदाजाहून महसुलाचे प्रमाणही घटले आहे.
महसुल संकलनाला गती देणे हे सध्या सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. विकासदर घसरत असताना महसूल संकलनही कमी झाल्याचे इंडिया रेटिंग्जचे मुख्य अर्थतज्ज्ञ सुनील सिन्हा यांनी सांगितले. इंडिया रेटिंग्ज ही फिच कंपनीची पतमानांकन संस्था आहे.
महालेखापरीक्षकांच्या (सीजीए) आकडेवारीनुसार चालू वर्षात कॉर्पोरेट कर हा केंद्र सरकारच्या महसुलाचा सर्वात मोठा स्त्रोत राहिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात कॉर्पोरेट कर संकलन हे गतवर्षीहून २,६५२ कोटी रुपयांनी कमी झआले आहे. मागील आर्थिक एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान २ लाख ९१ हजार २५४ कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट कराचे संकलन झाले. तर चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान केवळ २ लाख ८८ हजार ६०२ कोटी रुपयांचे कर संकलन झाले.
अर्थमंत्री यांनी चालू आर्थिक वर्षात कॉर्पोरेट करात १४.१५ टक्के वाढ होईल, असा अंदाज केला होता. मात्र, सीतारामन यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॉर्पोरट करात कपातीचा निर्णय घेतल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्याचा खरा परिणाम हा आगामी अर्थसंकल्पात दिसून येणार आहे. तर प्रत्यक्षात कॉर्पोरेट कराचे संकलन किती झाले हे फेब्रुवारी २०२१ मध्ये समजू शकणार आहे. मात्र, कॉर्पोरेट करात कपात केल्याने कर संकलन झाल्याचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दिसून आले आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये कॉर्पोरट कराचे संकलन हे २३,४२९ कोटी रुपये झाले आहे. तर मागील आर्थिक वर्षात ऑक्टोबरमध्ये २६,६४८ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर जमा झाला होता. तर नोव्हेंबरमध्ये केवळ १५,८४६ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर जमा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या नोव्हेंबरमध्ये २०,८६४ कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर जमा झाला होता. त्यामुळे निव्वळ कर संकलन हे पहिल्या आठ महिन्यात अंदाजाहून केवळ ४५.५ टक्के जमा झाले आहे. अर्थतज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि वैयक्तिक करात सुधारणा होवूनही कर संकलनाची स्थिती आणखी बिघडणार आहे.