मुंबई -जीडीपी हा ५ टक्क्यापर्यंत घसरल्याने आर्थिक आपतकालीन स्थितीचे चित्र स्पष्ट होत असल्याचे मत उद्योगपती किरण मुझुमदार शॉ यांनी व्यक्त केले. सरकारला जागे होण्याची वेळ आली असून आणखी व वेगाने कृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्या 'इंडिया इकॉनॉमिक कॉनक्लेव्ह २०१९' च्या बंगळुरूमधील कार्यक्रमात बोलत होत्या.
किरण मुझुमदार शॉ म्हणाल्या, ५ टक्के जीडीपी कमी होईल हे कुणालाही अपेक्षित नव्हते. उत्पादन क्षेत्र हे महत्त्वाचे क्षेत्र असून त्यावर सरकारने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. जर अर्थव्यवस्था घसरत असल्याची वस्तुस्थिती असेल तर पुढे काय? असा त्यांनी यावेळी सवाल केला.
अर्थव्यवस्था केवळ घसरत नाही तर ठप्प होत असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे त्या म्हणाल्या, विकासदर घसरत असल्याच्या आकडेवारीमधून मागणी कमी झाल्याचे सूचित होत आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जीएसटीमधील २८ टक्क्यांची वर्गवारी पूर्णपणे दूर करावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. त्या २८ टक्के जीएसटीचा वाहन उद्योग आणि हॉस्पॅटिलिटी क्षेत्रावर वाईट परिणाम होत आहे. त्यातून नोकऱ्यांवर विपरित परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर कमी करून सरकार मागणी वाढविण्यासाठी मदत करू शकते. जास्त प्रमाणात खरेदी झाल्यास कर महसुलात घट होणार नाही, असे त्यांनी मत व्यक्त केले.