नवी दिल्ली - व्होडाफोन आयडियाचे सीमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना सेवेसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण आर्थिक ताळेबंदावर ताण आलेल्या व्होडाफोन आयडियाने मोबाईल सेवांचे शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला. हे दर १ डिसेंबरपासून कंपनी वाढविणार आहे.
ग्राहकांनी खात्रीशीर जागतिक दर्जाच्या डिजीटलचा अनुभव घ्यावा, यासाठी दर वाढविण्याचा निर्णय घेतल्याचे व्होडाफोन आयडियाने म्हटले आहे. कंपनीने प्रस्तावित दरवाढ नेमकी किती असेल, हे अद्याप जाहीर केलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व्होडाफोनला कोट्यवधी रुपये केंद्र सरकारला द्यावे लागणार आहेत. त्यामुळे व्होडाफोन आयडियाला दुसऱ्या तिमाहीत ५० हजार ९२१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
हेही वाचा-आर्थिक विकासदर आणखी घसरण्याची चिंता; ७२ अंशाने घसरून शेअर बाजार बंद
कंपनी व्यवसायात राहणे हे सरकारच्या दिलासादायक निर्णयावर अवलंबून असेल, असेही व्होडाफोन आयडियाने म्हटले. दूरसंचार क्षेत्रावर मोठा आर्थिक ताण आला आहे. याबाबत सचिवांची उच्चस्तरीय समिती दिलासा देण्यावर विचार करत असल्याचे व्होडाफोन आयडियाने म्हटले आहे.