नवी दिल्ली- देशाची अर्थव्यवस्था झोपण्यापासून वाचविण्यासाठी शक्य तेवढ्या तत्काळ सुधारणा करण्याची मागणी उद्योजक सज्जन जिंदाल यांनी केली. टाळेबंदी ३ मे रोजी संपण्याच्या पार्श्वभूमीवर उद्योजकाने ही मागणी केली आहे.
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मात्र, अर्थव्यवस्था चांगली होण्यासाठी लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे जेएसडब्ल्यू ग्रुपचे चेअरमन सज्जन जिंदाल यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, की अर्थव्यवस्था सचेतन ठेवण्यासाठी आपल्याला मोठे प्रयत्न करायला हवेत. अर्थव्यवस्थेमधील नैराश्य हा देशाला मोठा धोका असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. लस सापडेपर्यंत विषाणूचा धोका कायम राहणार आहे. ही अर्थव्यवस्था कमीत कमी वेळेमध्ये पूर्णक्षमतेने परत आणावी लागणार आहे. त्यासाठी नव्या पद्धतीने काम सुरळित होण्यासाठी मार्गांचा शोध घेण्याची गरज आहे. जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या प्रवक्त्याने उत्पादन कमी केल्याचे सांगितले. कंपनीचे देशातील सात ब्लास्ट फर्नेस उत्पादन केंद्र पूर्णपणे सुरळित चालू असल्याचेही प्रवक्त्याने सांगितले.