नवी दिल्ली - वाहन उद्योगातील मंदीचा फटका सुपर लक्झरी कार उत्पादक कंपन्यांना होत आहे. असे असले तरी लँबोर्गहिनीच्या वाहन विक्री चालू वर्षात ५० टक्क्याने वाढेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. सुपर लक्झरीमध्ये कंपन्या आव्हानांना सामोरे जात असल्याचे दिसत आहे. मात्र वाहन विक्री कमी होणार नसल्याची शक्यता लँबोर्गहिनीच्या भारतीय प्रमुखांनी व्यक्त केली.
लँबोर्गहिनी कंपनी सुपर स्पोर्ट्स कार असलेली 'हुराकॅन ईव्हो' सप्टेंबरपासून वितरित करणार आहे. यापूर्वी कंपनीने वुरुस एसयूव्ही ही स्पोर्ट कार बाजारात आणली आहे. या मॉडेलची दुप्पट विक्री होईल, असा कंपनीने विश्वास व्यक्त केला आहे. यापूर्वी कंपनीने ६० टक्के विक्री वाढेल, असा अंदाज व्यक्त केला होता. लँबोर्गहिनीचे भारतीय प्रमुख शरद अग्रवाल म्हणाले, आम्ही योग्यवेळी बाजारात मॉडेल आणली आहेत. त्यामुळे बाजारात आव्हानाऐवजी उत्सुकता तयार करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी ४५ वाहनांची विक्री करण्यात आली होती. या वर्षात किंवा पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत नवे मॉडेल लाँच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.