नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्यामुळे रोजंदारी आणि हातावर पोट असलेल्यांवर आभाळ कोसळले आहे. त्यांच्यासाठी अनेक मदतीचे हात समोर येत आहेत. भारतातील रिलायन्स या प्रसिद्ध उद्योग समूहाकडून तीन कोटी गरिबांना या काळात अन्नदान केले जाणार आहे.
रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी 'मिशन अन्न सेवा' या कार्यक्रमांतर्गत तीन कोटी कामगार, वंचित वर्गाला लॉकडाऊनच्या काळात अन्नपुरवठा करणार असल्याचे सांगितले. एखाद्या खासगी व्यावसायिकाने तीन कोटी नागरिकांना अन्न पुरवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याने हा जगातील सर्वात मोठा मोफत अन्न देण्याचा कार्यक्रम ठरला आहे. रिलायन्स समूहाकडून कोरोनाशी लढण्यासाठी 535 कोटी रुपयांचा मदतनिधी देण्यात आला आहे. पंतप्रधान मदत निधी फंडात 500 कोटी रुपयांची मदत केली आहे.
कोरोना महामारी ही मानवतेवर आलेले मोठे संकट आहे. रोज कमावून खाणाऱ्यांसाठी, कामगारांसाठी वाईट दिवस आहेत. हे लोक आमच्याच कुटुंबातील सदस्य आहेत. यासाठी रिलायन्स फाउंडेशनने 'मिशन अन्न सेवा' कार्यक्रम सुरू केला आहे, असे नीता अंबानी म्हणाल्या.
रिलायन्सकडून दररोज एक लाख मास्क, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पीपीई किट्स तसेच अत्यावश्यक सेवा देताना वाहनांमध्ये मोफत इंधनही देण्यात आले आहे. मुंबई महापालिकेसोबत भागिदारीमध्ये भारतातील पहिले 100 बेडचे एक्सक्लुझिव्ह रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्याची क्षमता आता 250 बेडपर्यंत वाढवण्यात आली आहे.
रिलायन्स रिटेलचे कर्मचारी 200 पेक्षा जास्त शहरांमध्ये कोट्यवधी भारतीयांना दररोज स्टोअर आणि होम डिलिव्हरीद्वारे आवश्यक वस्तू पुरवण्यासाठी ओव्हरटाईम काम करत आहेत. जिओ 40 कोटींपेक्षा जास्त लोक आणि हजारो संस्थांना डिजिटल कनेक्टिव्हिटी प्रदान करीत आहे, असे फाउंडेशनने म्हटले आहे.