नवी दिल्ली - वाहन उद्योगात मंदीची स्थिती असतानाच नॅनोचे उत्पादन आणि विक्री घटल्याचे समोर आले आहे. नॅनोचे जानेवारीपासून उत्पादन झालेले नाही. तर गेल्या सहा महिन्यात फक्त एका नॅनोची विक्री झाली आहे.
टाटा मोटर्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत नॅनोच्या उत्पादन आणि विक्रीची माहिती दिली आहे. नॅनो ही 'पीपल्स कार' म्हणून ओळखली जाते. मध्यमवर्गीयांना कमी किमतीत कार उपलब्ध करून देण्यासाठी टाटा कंपनीचे माजी चेअरमन रतन टाटा यांनी नॅनोचा उत्पादनाचा उत्पादन प्रकल्प सुरू केला.
नॅनोचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले. यापूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये गुजरातमधील सदानंद येथील उत्पादन प्रकल्पातून ८२ नॅनोचे उत्पादन घेण्यात आले होते. त्यानंतर एकाही नॅनोचे उत्पादन घेण्यात आले नाही. तर चालू वर्षात जानेवारी-जूनदरम्यान फेब्रुवारीत केवळ एका नॅनोची विक्री झाली आहे.
नॅनोचे मागणीप्रमाणे उत्पादन घेण्यात येत असल्याचे टाटा मोटर्सच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. चालू वर्षात जानेवारी-जून दरम्यान नॅनोची निर्यातही झालेली नाही.