नवी दिल्ली -गुजरातमधील आयटीआय बेचाराजीमध्ये मारुती सुझुकी इंडिया प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. या केंद्रातून दरवर्षी ७ हजार जणांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यासाठी कंपनीने प्रशिक्षण केंद्रात ४ कोटींची गुंतवणूक केली आहे.
बेचाराजी येथे सेंटर ऑफ एक्सेलन्स (सीओई) गुजरात सरकारच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे. यामधून आयटीआयच्या केंद्रामधील विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञानाचा दर्जा सुधारण्यात येणार आहे. या माध्यमातून केंद्र सरकारच्या स्किल इंडिया इनिशिटिव्ह योजनेत योगदान दिले जाणार असल्याचे मारुती सुझुकी इंडियाने सांगितले आहे. या केंद्रात गुजरातमधील इतर आयटीआय केंद्राच्या विद्यार्थ्यांनादेखील प्रशिक्षण दिले जाणार आहे.
असे असणार प्रशिक्षण केंद्र-
हे केंद्र ११ हजार ८०० स्क्वेअर फूट जागेवर असणार आहे. त्यामध्ये १५० विद्यार्थ्यांना दर आठवड्याला प्रशिक्षित करण्याची क्षमता आहे. प्रशिक्षण केंद्रात बेसिक ट्रेनिंग लॅब, वेल्ट शॉप, पेंट शॉप, असेंब्ली शॉप आदीसह ६ वर्गखोल्या असणार आहेत. एमएसआयने सुमारे ४ कोटींची गुंतवणूक या प्रशिक्षण केंद्रात केली आहे. तसेच यापुढेही प्रशिक्षण केंद्रात गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
विविध ट्रेडमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सेंटर ऑफ एक्सेलन्सचा फायदा होईल, अशी माहिती मारुती सुझुकी इंडियाचे संचालक तथा सीईओ केनिची आयुकावा यांनी दिली. रोजगार मिळविण्यासाठी हे योग्य कौशल्य असल्याचेही आयुकावा यांनी सांगितले.
ऑटोमोबाईल हे सर्वात अधिक रोजगार देणाऱ्या क्षेत्रापैकी एक क्षेत्र आहे. हे क्षेत्र वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांना भविष्यातील संधीसाठी त्याचा फायदा होणार आहे.