नवी दिल्ली- देशाला जागतिक उत्पादनाचे 'हब' करण्यासाठी भारताने व्हिएतनाम आणि चीनबरोबर स्पर्धा करायला हवी, असे मत शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू जैन म्हणाले. ते दोन्ही देश आकर्षक आणि स्थिर गुंतवणुकीच्या धोरणांचा अवलंब करत असल्याचे जैन म्हणाले.
मनू जैन यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारतामधून बांगलादेश आणि नेपाळमध्ये स्मार्टफोन निर्यात करण्यात येतात. भारताने अधिक निर्यातस्नेही करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये निर्यातदाराला शुल्काचा परतावा मिळवून देण्यासारख्या उपक्रमाचा समावेश होवू शकतो, असे जैन यांनी सांगितले.
जागतिक दर्जाच्या चाचण्यांसाठी प्रयोगशाळांमध्ये गुंतवणुकीची गरज आहे. भारतीय मानांकन संस्थेमधील (बीआयएस) चाचण्यांना जगभरात स्वीकारले जात नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पुढे ते म्हणाले, स्थानिक उत्पादनांना सवलती देण्यासाठी भारताने व्हिएतनामपासून खूप काही शिकायला हवे. सरकारने निर्यात उत्पादनांवर सवलती (आरओडीटीईपी) जाहीर केल्या आहेत. मात्र, हे जागतिक व्यापार नियमांचे पालन करत नाही.
आरओडीटीईपीबाबतची संदिग्धता दूर करायला हवी. सरकारकडून सवलती जाहीर करण्यात आल्या तर मोठ्या प्रमाणात शाओमी मोठ्या प्रमाणात निर्यात करेल, असेही जैन यांनी सांगितले.